माझे जुने दिवस
आता कधीही पक्षी होतात
निळ्या निळ्या
आकाशाची ओढ लावतात
रणरणतं ऊन पाठीवर
घेऊन हिंडू म्हणतात
आनंदाच्या गर्भातली
गाणी गाऊ म्हणतात
हरवलेल्या जागा
आता सापडणार नाहीत
नसलेल्या पऱ्या
आता पुन्हा दिसणार नाहीत
तरीही जुने
दिवस आता कधीही पक्षी होतात
निळ्या निळ्या
आकाशाची ओढ लावतात
पावसाळ्यातली
छोटी तळी फोडू म्हणतात
टणटणीच्या मधाची
खळी चोखू म्हणतात
पाऊस आता मोरासारखा
झेलवणार नाही
आईचा पदर आता
ओलं डोकं पुसणार नाही
तरीही जुने
दिवस आता कधीही पक्षी होतात
निळ्या निळ्या
आकाशाची ओढ लावतात
अंगणात झोपून
चल चांदण्या मोजू म्हणतात
शंभर व्हायच्या
आत घनघोर घोरू म्हणतात
हरवलेलं अंगण
आता मुळीच मिळणार नाही
राजाराणीची
गोष्ट आता कुणीच सांगणार नाही
तरीही जुने
दिवस आता कधीही पक्षी होतात
निळ्या निळ्या
आकाशाची ओढ लावतात
तळे झालेले
डोळे आईपाशी घेऊन जाऊ म्हणतात
क्षणात खुलणाऱ्या
कळीचे कारंजे झेलू म्हणतात
खुडलेल्या कळ्या
आता पुन्हा फुलणार नाहीत
वाती हरवलेले
दिवे पुन्हा चेतणार नाहीत
तरीही जुने
दिवस उगीच कधीही पक्षी होतात
निळ्या निळ्या
आकाशाची ओढ लावतात