Tuesday, December 21, 2021

जुने दिवस

 

माझे जुने दिवस आता कधीही पक्षी होतात

निळ्या निळ्या आकाशाची ओढ लावतात

 

रणरणतं ऊन पाठीवर घेऊन हिंडू म्हणतात

आनंदाच्या गर्भातली गाणी गाऊ म्हणतात

हरवलेल्या जागा आता सापडणार नाहीत

नसलेल्या पऱ्या आता पुन्हा दिसणार नाहीत

तरीही जुने दिवस आता कधीही पक्षी होतात

निळ्या निळ्या आकाशाची ओढ लावतात

 

पावसाळ्यातली छोटी तळी फोडू म्हणतात

टणटणीच्या मधाची खळी चोखू म्हणतात

पाऊस आता मोरासारखा झेलवणार नाही

आईचा पदर आता ओलं डोकं पुसणार नाही

तरीही जुने दिवस आता कधीही पक्षी होतात

निळ्या निळ्या आकाशाची ओढ लावतात

 

अंगणात झोपून चल चांदण्या मोजू म्हणतात

शंभर व्हायच्या आत घनघोर घोरू म्हणतात

हरवलेलं अंगण आता मुळीच मिळणार नाही

राजाराणीची गोष्ट आता कुणीच सांगणार नाही

तरीही जुने दिवस आता कधीही पक्षी होतात

निळ्या निळ्या आकाशाची ओढ लावतात

 

तळे झालेले डोळे आईपाशी घेऊन जाऊ म्हणतात

क्षणात खुलणाऱ्या कळीचे कारंजे झेलू म्हणतात

खुडलेल्या कळ्या आता पुन्हा फुलणार नाहीत

वाती हरवलेले दिवे पुन्हा चेतणार नाहीत

तरीही जुने दिवस उगीच कधीही पक्षी होतात

निळ्या निळ्या आकाशाची ओढ लावतात

No comments:

Post a Comment

Featured post

तुला घरच नाही