निळ्या दिव्याच्या
उजेडातल्या
तुझ्या शरीराच्या
निळ्या थरथरीनं
पेलून धरलेली ही पृथ्वी
न्हाऊन निघाली आहे
तुझ्या निळाईत
तुझ्या निळाईनं
सामावून घेतलेला समुद्र
अन् कवेत घेतलेलं आकाश
करतं आहे प्रवास
निरभ्रतेकडे
आणखी आणखी
निळ्या निरभ्रतेकडे ...
निळ्या दिव्याच्या
उजेडातल्या
तुझ्या शरीराच्या
निळ्या थरथरीनं
पेलून धरलेली ही पृथ्वी
न्हाऊन निघाली आहे
तुझ्या निळाईत
तुझ्या निळाईनं
सामावून घेतलेला समुद्र
अन् कवेत घेतलेलं आकाश
करतं आहे प्रवास
निरभ्रतेकडे
आणखी आणखी
निळ्या निरभ्रतेकडे ...
कातरवेळेस-
दिवा न लावता,
अंधाराच्या असले - नसलेपणावर
हातपाय पसरून पहुडावं बेफिकीरपणे,
आपलं आयुष्य आपलं नसल्यासारखं.
आतड्यात तुडुंब भरून राहीलेली ओल
डोळ्यावर कातडं ओढून
नरड्याची घाटी हलवत,
पीत रहावं एकांतात बसून
दारू पित राहील्यासारखं.
आधी घरभर
नंतर आभाळभऱ पसरलेल्या अंधाराशी
एकरूप झालेलं शरीर
एकांताच्याही भानापलीकडे गेल्यानंतर -
एैन मध्यरात्री माथ्यावर आलेल्या चंद्राच्या तुकड्याच्या गुरूत्वाकर्षणाला
बिनदिक्कत द्यावी परवानगी-
...आतड्यातील ओल जाऊ द्यावी भरतीला शरण
वयात आलेल्या नवतीसारखी
अन कातरवेळी पोटाला पीळ पाडणारा हुंदका
करावा मोकळा अंधाराच्या तळापासून
अंधाराच्या असलेपणापर्यंत.
पोरपण माझे परतूनी येते
मी गलबलून सारखा जातो
अंधारावर कोरून तुजला
रात्री मी पोरका होतो
रात्र तुजला घेऊन येते
तेव्हाचे होऊन जातो आपण
गर्भात उमगल्या अंगाईला
काळाचे गं कसले कुंपण
मेघांचे डोळे अंगाईला अन्
तुझ्या स्वरांची ओली मखमल
भारावल्या पावलांनी येते
परतून माझी शैशव धून
तुमच्याकडे
आता मी काही मागणार नाही
भुकेचाच
माझ्या मला कैफ आहे
ज्यांनी
नाकारले माणूसपण माझे
त्या
बेगडी उत्सवांशी माझे वैर आहे
नकारविकारांची
आहेत आभूषणे माझी
वाळवंटातूनच
आता माझी नित्य सैर आहे
दुष्काळच
झाला जेव्हा सखा माझा
पावसाची
आठवणसुद्धा आता गैर आहे
फुलांचे
मोसम इथे कधी आलेच नाहीत
माझ्या
उत्सवाच्या दिवसांनाही काट्यांची सवय आहे
आता
हसण्याची चिंता करू कशाला मी
आसवांनीच
जेव्हा मला दिले अभय आहे
कण
आनंदाचे मागता मागता
मी
आता पुरता थकलो आहे
देतो
सुखाला निरोप मी
दु:खांच्या
देशात विसावलो आहे...
उधाणला तेव्हा
पाऊस जहरी अन निष्पर्ण झाली झाडी
मनातले मोर रानभरी झाले अन शिकाऱ्यांनी उपसल्या त्यांच्या कट्यारी
धपापत जगण्याचेच होते प्राक्तन माझे अलगद सांडली उंच भरारी
अश्वत्थाम्याची नक्षी कोरून भाळी बासरीविनाच फिरतो तुझा मुरारी
वांझोट्या माझ्या साऱ्या सदिच्छा अन शापांचे मोहोळ तुझ्या माथी
चिरंतन वेदनेने झाली समृद्ध लखलख माझी कुबेरी श्रीमंती
ही शामल
संथ रात्र
निघाली
निद्रेचे मोर घेऊन
रात्रीस
रंग आला
भूतकाळाचे
जहर पिऊन
एकटाच
जगात मी
चंद्रावरती
तुझी वस्ती
तुझे चांदणेच
आता
पांघरतो
मी देहावरती
दार घराचे
उघडे माझे
अंधाराला
पिऊन घेते
दूर जळतो
दिवा कुठे
धग त्याची
इथे बरसते
तुझ्या
केतकीच्या रंगाने
रंगवतो
मी शामल रात्री
फुले सारी
संपून गेली
वाहतो
निर्माल्य गात्री गात्री
प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे -
एक निबिड जंगल.
क्षणाक्षणांची झाडं रूजून,
बेफाम पसरणारं.
प्रत्येकाचं दु:ख
म्हणजे –
एक अरण्यरूदन.
मनात उगवूनही,
थेटपणे
कोणत्याच मनापर्यंत ,
न पोचणारं.
---गणेश
गोडसे---
जपून ठेवलेला अश्रू
कधी उद्दाम होतो...
अन ओघळतोच.
दबा धरून बसलेली
दुःखाची श्वापदं
जन्माची असतात उपाशी
त्यांना नाहीच रोखता येत.
आपण चुकीच्या जगात जन्म घेतल्यासारखे
असहाय्य
एकाकी
व गै रे ...
गणेश
गोडसे