Saturday, January 22, 2022

कातरवेळेस-

 

कातरवेळेस-

दिवा न लावता,

अंधाराच्या असले - नसलेपणावर

हातपाय पसरून पहुडावं बेफिकीरपणे,

आपलं आयुष्य आपलं नसल्यासारखं.

आतड्यात  तुडुंब भरून राहीलेली ओल

डोळ्यावर कातडं ओढून 

नरड्याची घाटी हलवत,

पीत रहावं एकांतात बसून 

दारू पित राहील्यासारखं.


आधी घरभर 

नंतर आभाळभऱ पसरलेल्या अंधाराशी

एकरूप झालेलं शरीर

एकांताच्याही भानापलीकडे गेल्यानंतर -

एैन मध्यरात्री माथ्यावर आलेल्या चंद्राच्या तुकड्याच्या  गुरूत्वाकर्षणाला

बिनदिक्कत द्यावी परवानगी-

...आतड्यातील ओल जाऊ द्यावी भरतीला शरण

वयात आलेल्या नवतीसारखी

अन कातरवेळी पोटाला पीळ पाडणारा हुंदका 

करावा मोकळा अंधाराच्या तळापासून

अंधाराच्या असलेपणापर्यंत.


No comments:

Post a Comment

Featured post

तुला घरच नाही