जपून ठेवलेला अश्रू
कधी उद्दाम होतो...
अन ओघळतोच.
दबा धरून बसलेली
दुःखाची श्वापदं
जन्माची असतात उपाशी
त्यांना नाहीच रोखता येत.
आपण चुकीच्या जगात जन्म घेतल्यासारखे
असहाय्य
एकाकी
व गै रे ...
भूकबळी आणि आत्महत्या,
हे व्यवस्थेने केलेले खून आहेत...
असं जेव्हा तू म्हणालास -
तेव्हा दचकून मागे फिरलेले लोक
प्रस्थापितांच्या पायाशी जाऊन बसले...
चढत्या आणि उतरत्या आकडेवारीचे घोळ ऐकून
त्यांनी आनंदाने टाळ्या पिटल्या
त्या भाटांनी मग तुला शिव्या घातल्या
आपले अमोल आत्मे कत्तलखान्याच्या खुंटीवर टांगून
उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे फलक हाती घेऊन ते बाहेर पडले
त्यांच्या काखेतल्या झोळीतील मूठ-मूठ सत्ता ते चाचपून पाहत होते,
क्रांती झाल्यासारखा प्रचंड जल्लोष करत होते
अन उद्याच्या महासत्तेचे ढोल बडवत होते
तू तारस्वरात ओरडत होतास
भूकबळी आणि आत्महत्या ...
पण खरं सांग
त्या पाताळभेदी जल्लोषात तुझा आवाज तुला तरी ऐकू येत होता का?
हाकणाऱ्याचं आपलं बरं असतं ओढणाऱ्याला मात्र ओढावं लागतं अन ओढणारे ओढून मेले तरी नाव मात्र हकणाराचंच होतं सेनापतीचं आपलं बरं असतं सैन्याला मात्र लढावं लागतं अन लढणारे लढून मेले तरी सेनापतीलाच इतिहासात नोंदवावं लागतं निर्मिकाचं आपलं बरं असतं भोग मात्र आपण भोगतो अन कितीही भोगलं तरी नाव मात्र त्याचंच घेतो फार थोड्यांचंच असं बरं असतं बाकीच्यांचं काही खरं नसतं आपणच त्यांना मोठे करतो अन आपणच शेवटी खोटे ठरतो